Ad will apear here
Next
शांता हुबळीकर, अली अकबर खाँ, एम. विश्वेश्वरय्या, नितीन बोस, चंदू पारखी
अभिनेत्री शांता हुबळीकर, सरोदवादक अली अकबर खाँ यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. तसेच, कर्तृत्ववान अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, दिग्दर्शक नितीन बोस आणि अभिनेते चंदू पारखी यांचा १४ एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.....
शांता हुबळीकर
१४ एप्रिल १९१४ रोजी शांता हुबळीकर यांचा जन्म झाला. चार चौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रूपेरी पडदा चांगलाच गाजवला. वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायनदेखील; पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भूमिका साकारली. 

याचदरम्यान कोल्हापूर सिनेटोनमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके गंगावतरण हा चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटात शांता हुबळीकरांनी गंगेची भूमिका केली व एका गाण्यासाठी गायन देखील केले होते. भालजी पेंढारकर यांच्या ‘कान्होपात्रा’ या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली. त्या वेळी त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. 

‘कान्होपात्रा’तील भूमिकेमुळेच शांताबाईंना प्रभात फिल्म कंपनीत ‘माझा मुलगा’, ‘माणूस’ या दोन चित्रपटांत नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक तर झालंच; पण त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली. ‘माणूस’ चित्रपटातील ‘कशाला उद्याची बात’ हे त्यांचे गाणे आजही श्रवणीय वाटते. 

दुर्गा खोटे निर्मित ‘सवंगडी’ चित्रपटासाठीही शांता हुबळीकरांनी गाणी गायली. ‘प्रभात’, ‘घर की लाज’, ‘कुलकलंक’, ‘मालन’, ‘घरगृहस्थी’, ‘सौभाग्यवती भव’ इत्यादी हिंदी चित्रपटांतही त्यांनी कामे केली व पुन्हा एकदा त्या मराठी चित्रपटांकडे वळल्या. विश्राम बेडेकर दिग्दर्शित ‘पहिला पाळणा’मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. मातृभाषा कानडी असूनही शांताबाईंनी फक्त एकाच कानडी चित्रपटात काम केले. चित्रपटाचे नाव होते ‘घरसंसार.’ फिल्मिस्तानच्या ‘सौभाग्यवती भव’ या सिनेमात पहिल्यांदाच चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली. 

शांता हुबळीकर ‘माणूस’मध्ये वारांगनेची भूमिका साकारण्याबद्दल म्हणत, ‘‘माणूस’मध्ये वारांगनेची भूमिका करताना मला मुळीच कमीपणा वाटला नाही. काही झाले तरी मी ‘प्रभात’ चित्राची नायिका होते. ‘कशाला उद्याची बात’ या बहुभाषक गाण्यातील उच्चार, ते म्हणण्याची पद्धत मी मन लावून दिवस-दिवस शिकत होते. त्यात कोणी दोष काढू नये म्हणून. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘पोरगी काम कसे करते बघ’ हे दाखवण्यासाठी शांतारामबापू आपल्या आईला स्टुडिओच्या गॅलरीत आणून बसवीत.’ 

शांता हुबळीकर यांचे निधन १७ जुलै १९९२ रोजी झाले. 
.............


उस्ताद अली अकबर खाँ 
१४ एप्रिल १९२२ रोजी पूर्व बंगालमध्ये जन्मलेल्या अली अकबर खाँ यांचे गायन वयाच्या तिसऱ्या वर्षीच सुरू झाले होते. त्यांचे घराणे हे तानसेन यांच्या घराण्याशी नाते सांगणारे आहे. अली अकबर खाँ यांचे वडील पद्मविभूषण डॉ. अल्लाउद्दिन खाँ हे उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महनीय नाव होते. त्यांनी वयाच्या शंभराव्या वर्षापर्यंत आपल्या मुलाला शास्त्रीय गायनाचे शिक्षण दिले. परंतु त्यांना सरोद या वाद्यावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. 

अली अकबर खाँ हे जोधपूरच्या राजघराण्यात सात वर्षे दरबारी गायन करीत होते. तेथेच त्यांना उस्ताद ही पदवी मिळाली होती. त्यांनी भारतासह भारताबाहेरही शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण सुरू केले होते. पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून पाच दशके ओळखले जात होते. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड यहुदी मेनुहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. 

वयाच्या १३व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २०व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड यहुदी मेनुहिन यांच्या विनंतीवरून १९५५ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीतविश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६मध्ये कोलकाता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. 

पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५मध्ये त्यांनी अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले. कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लंडमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-मर्चंट यांच्या हाउस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इत्यादी चित्रपटांनाही पार्श्वसंगीत दिले होते. उस्ताद अली अकबर खाँ यांचे निधन १९ जून २००९ रोजी झाले. 
..............


सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
१५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटक राज्यातील मुद्देनहळ्ळी या गावी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला. त्यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडित होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच; पण घरची हलाखीची होती. त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहून गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले व ते बेंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.

तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन बीए केले. आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची आस लागली. गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसूरच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली. तीही साधीसुधी नाही, तर सक्करपासून थेट दावणगेरेपर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम येऊन. या देदीप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच १८८४मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणूक केली.

तेथेही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिती केली. यामुळे विशिष्ट पातळीवरील अतिरिक्त पाणीच वाहून जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाइनचे नावच पुढे विश्वेश्वरय्या गेट असे झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता; पण नियतीला त्यांच्याकडून अजून काही भव्यदिव्य करून घ्यायचे होते. 
त्यांची कीर्ती ऐकून हैदराबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशेष सल्लागारपद दिले. येथे त्यांनी हैदराबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधून शहर पूरमुक्त केले आणि त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंतापदाची ऑफर दिली व त्यांनी ती स्वीकारली. म्हैसूरला ते १९२६पर्यंत राहिले. त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.

काही काळ ते दिवाणही होते. याव्यतिरिक्त उद्योग, सिंचन, शेती या क्षेत्रांतही त्यांनी मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळून पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टीम ही त्यांचीच देणगी. म्हैसूरच्या नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील म्हैसूर सोप फॅक्टरी, कीटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्क्स, श्री जयचमा राजेंद्र पॉलिटेक्निक इस्टिट्यूट, बेंगळुरू कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, सेंच्युरी क्लब, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणित औद्योगिक प्रकल्प सुरू केले. 

त्यांनी उद्योगात खासगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतही त्यांनी योगदान केले. म्हैसूरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकीच नव्हे, तर उद्योग, अर्थ, नगरसुधार इत्यादी कार्यांत त्यांनी मोलाचे योगदान दिले. समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटिशांनीही त्यांना, त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे ‘नाइट’ (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे निधन १४ एप्रिल १९६२ रोजी झाले. 
......
नितीन बोस
२६ एप्रिल १८९७ रोजी नितीन बोस यांचा जन्म झाला. नितीन बोस १९३४ साली ‘चंडीदास’ चित्रपटाची हिंदी आवृत्ती काढून निष्णात छायालेखकाचे कल्पक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाले. ते कलकत्त्याच्या न्यू थिएटर्ससाठी दिग्दर्शक म्हणून काम करत असत. १९३० आणि १९४०च्या दशकांत चंडीदास, प्रेसिडेंट आणि दुश्मन यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले. पार्श्वगायन १९३५ साली ‘धूप-छाव’ या नितीन बोस दिग्दर्शित आर. सी. बोराल यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातून सुरू झाले. 

नितीन बोस यांच्या चित्रपटातील तांत्रिक सफाई डोळ्यात भरण्यासारखी असे. नितीन बोस यांनी प्रेक्षकांना भावनाप्रधान करून सोडतील, अशा प्रसंगांची पेरणी आपल्या ‘गंगा जमुना’ या चित्रपटभर करून ठेवली होती. ‘गंगा जमुना’तील ग्रामीण हिंदीच्या वापराने त्या काळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; मात्र निर्मात्यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि हा प्रयोग अपेक्षेपलीकडे यशस्वी ठरला. भारत सरकारने १९७७ साली नितीन बोस यांना दादासाहेब फाळके देऊन गौरव केला होता. नितीन बोस यांचे निधन १४ एप्रिल १९८६ रोजी झाले.
.........
चंदू पारखी
उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या, दर्जेदार मुद्राभिनय, स्लॅपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातीत लवचिकता, हजरजबाबीपणा व अफाट टायमिंग सेन्स! चंदू पारखी यांची ही गुणवैशिष्ट्ये. ते महान विनोदवीरच होते. चंदू पारखी यांनी अनेक नाटके व चित्रपटांतून भूमिका केल्या. 

‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकात चंदू पारखी यांनी छोटा रोल स्वीकारून त्याचे चीज केले. आपल्या ढिल्या चालीतून, बेरकी कटाक्षांमधून आणि खोल खर्जातल्या संवादातून त्यांनी गोवर्धनचा भेसूरपणा उभा केला. एरव्ही इंदुरी नजाकत आणि मूर्तिमंत विनम्रपणाचा अवतार असलेले चंदू पारखी रंगमंचावर पाऊल ठेवताच नखशिखान्त बदलून जात असत. निळू फुले म्हणत असत, ‘माझी जागा चंदू पारखी घेईल.’ चंदू पारखी यांनी जबान संभाल के, आडोस पडोस, रिस्ते नाते या सीरियल्स व तमन्ना, अंगारा या चित्रपटांत कामे केली. चंदू पारखी यांचे निधन १४ एप्रिल १९९७ रोजी झाले. 

माहिती संकलन : संजीव वेलणकर

(ख्यातनाम गायिका शमशाद बेगम यांचाही १४ एप्रिल हा जन्मदिन. त्यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)








 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZTUCL
Similar Posts
अब्दुल हलीम जाफर खान, पं. उल्हास बापट, सर आयझॅक पिटमॅन ज्येष्ठ सतारवादक अब्दुल हलीम जाफर खान, ख्यातनाम संतूरवादक पं. उल्हास बापट आणि लघुलिपीचे (शॉर्टहँड) जनक सर आयझॅक पिटमॅन यांचा चार जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
रामदास पाध्ये, हंसा वाडकर, सुभाष घई, जे. ओमप्रकाश बोलक्या बाहुल्यांचे खेळ प्रसिद्ध करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये, मराठी अभिनेत्री-नृत्यांगना रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर, राज कपूरनंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई, प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते जे. ओमप्रकाश यांचा २४ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय
डॉ. सतीश धवन, अरविंद देशपांडे, जॉय अॅडम्सन नामवंत अंतराळशास्त्रज्ञ डॉ. सतीश धवन, ख्यातनाम अभिनेते अरविंद देशपांडे आणि वन्यजीवनाबद्दल लेखन करणाऱ्या लेखिका जॉय अॅडम्सन यांचा तीन जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...
प्रा. मधू दंडवते, शांताराम आठवले समाजवादी नेते, अर्थतज्ज्ञ व समाजसेवक प्रा. मधू दंडवते आणि नामवंत साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले यांचा २१ जानेवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language